talathi bharti – तलाठी भरती-पात्र उमेदवारांनो, मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहा ; तलाठी भरती,निवड व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांच्या आस्थापनेवरील तलाठी (गट क) संवर्गातील पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांचे सामान्यीकरण करून पात्र उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित कार्यालयाच्या www.beed.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील निवड झालेल्या व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले.
गेल्यावर्षी तलाठी भरतीच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद पात्रतेसंदर्भात अनुषांगिक मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित छायाप्रतीच्या दोन संचांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात उपस्थितीसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
अशा आहेत उमेदवारांना सूचना
मूळ ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स) पडताळणी वेळी सादर करावे. https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा. दिव्यांग, खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केलेल्यांनी विहित नमुन्यातील मूळ प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणीसाठी सोबतच्या परिशिष्ट- क मध्ये जोडलेला साक्षांकन नमुना परिपूर्ण भरून (दोन प्रतीत) प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करावा.
कोणत्याही आरक्षणाचा अथवा सोयी-सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा/ नियम/आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मागासवर्ग (अ.जा./अ.ज. वगळून) प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी भरलेला सेतू कार्यालयातील अर्ज व सादर केलेली सर्व कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस दोन प्रतीत स-साक्षांकित करून सादर करावीत. पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती २०२३ मधील निवड प्रक्रियेकरिता दावा करता येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सचिव शिवकुमार स्वामी यांनी म्हटले आहे.
असे आहे वेळापत्रक
सोमवारी (ता. पाच) ११ वाजता : निवड यादीतील अराखीव (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी.
मंगळवारी (ता. सहा) : दुपारी एक वाजता निवड यादीतील इमाव, विमाप्र, भजड, भजकभजब, विजाअ, अज, अजा प्रवर्गातील उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणी होईल.
बुधवारी (ता. सात) : सकाळी ११ वाजता प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार तसेच तलाठी भरतीच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.
गुरुवार (ता. आठ) : सकाळी ११ वाजता निवड यादीमधील सर्व सामाजिक प्रवर्गांतील सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.